मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे..
कोथरूड मधील सिटीप्राईड सिनेमागृह समोर "गोखले बिझनेस बे" नावाने एक भव्य व्यवसायिक संकुल उभारण्यात आले आहे. सदर जागेवर पार्किंग चे ( वाहनतळाचे ) आरक्षण होते. आता ह्या संकुलात जमिनीखाली ( underground ) तब्ब्ल दीड लाख फूट येवढे अवाढव्य पार्किंग उपलब्ध असून हे पार्किंग पुणे मनपा ने नागरिकांसाठी त्वरित खुलं करावं अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांना निवेदन सादर केले असून त्यात त्यांनी ही मागणी मांडली आहे.
सदर पार्किंग ची जागा वर्षापूर्वीच पुणे मनपाच्या ताब्यात देखील देण्यात आली आहे,मात्र अज्ञात कारणांमुळे आजपर्यँत सदर जागेचा वापर सुरु झालेला नाही.
या वाहनतळात सुमारे चारशे चारचाकी वाहने व शेकडो दुचाकी पार्क करता येतील. मात्र मनपा च्या अनास्थेमुळे अद्याप हे वाहनतळ नागरिकांसाठी उपलब्ध झालेले नाही असेही खर्डेकर म्हणाले.सध्या सदर व्यवसायिक संकुलात संबंधित बांधकाम व्यवसायिकाचे पार्किंग उपलब्ध असून त्या इमारतीत असणाऱ्या विविध दुकानात किंवा ऑफिस मध्ये जाणाऱ्या नागरिकांना सध्या उपलब्ध पार्किंग मध्ये चार चाकी साठी 50 रुपये तर दुचाकीसाठी 20 रुपये शुल्काचा भुर्दंड भरावा लागतो.
ह्या ठिकाणी अनेक व्यवसायिक संकुल, मॉल इ असल्यामुळे रस्त्यावरील पी 1 पी 2 पार्किंग कायम फूल असते व येथे ट्रॅफिक पोलीस देखील सजगतेने कारवाई करत असतात.मग नागरिकांना नाईलाजाने जादा पैसे भरून गोखले बिझनेस बे च्या पार्किंग मध्ये वाहने लावावी लागतात.
मनपा ने अद्याप पर्यंत हे वाहनतळ खुलं का केलं नाही याचा खुलासा करावा व त्वरित या वाहनतळाची निविदा काढून मनपा ने निर्धारित केलेल्या दरात सदर वाहनतळ सामान्य नागरिकांना उपलब्ध करून द्यावे अशी आग्रही मागणी संदीप खर्डेकर यांनी केली आहे.




Post a Comment
0 Comments