मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे: एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२५ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीच्या निमित्ताने देशभरातील युवा संशोधकांचा मेळा रंगणार आहे.
एमआयटी एडीटी विद्यापीठ परिसरात ८ ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान देशभरातील २४ संघांमध्ये ही राष्ट्रीय स्पर्धा रंगणार आहे. ज्यात, ते भारत सरकारचे रक्षा, विज्ञान मंत्रालय आणि एआयसीटीई समोरील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना मांडतील. प्रत्येक समस्येच्या विजेत्यास ₹१.५ लक्षचे बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ ८ डिसेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, टीसीएस फाऊंडेशनचे संचालक चिंतन अधिया, एसव्ही ग्रुपचे संस्थापक विकास दांगट, बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डाॅ.धिरज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलपती तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ..मंगेश कराड हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. सोबतच, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., कार्यकारी संचालक डॉ.सुनिता कराड, प्रोवोस्ट डाॅ.सायली गणकर, प्र.कुलगुरू डॉ. मोहित दुबे, डॉ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, नोडल सेंटर मुख्य अधिकारी डाॅ.निशांत टिकेकर, स्पर्धा निमंत्रक व कार्यवाह प्रा.सुरेश कापरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेचे केंद्रीय उद्घाटन ०८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता केले जाईल. 2017 साली सुरू झालेला स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (एसआयएच) हा भारतातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे. हा जगातील सर्वात मोठा ओपन इनोव्हेशन मॉडेल म्हणून ओळखला जातो. यंदा संस्थात्मक हॅकाथॉन्समध्ये २६०% वाढ झाली आहे. २०२४ मधील २१२५ हॅकाथॉन्सच्या तुलनेत २०२५ मध्ये २५८७ अंतर्गत हॅकेथॉन आयोजित झाले. यासह, ६८,७६६ विद्यार्थी संघांनी राष्ट्रीय स्तरासाठी पात्रता मिळवली. या स्पर्धेमधून यंदा ७२, १६५ नाविन्यपूर्ण कल्पना मिळाल्या आहेत. विद्यार्थी संघांनी ५४ मंत्रालये, विभाग आणि उद्योग यांनी दिलेल्या २७१+ समस्यांवर काम केले आहे, अशी माहिती डाॅ. मोहित दुबे, डाॅ.महेश चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एसआयएच-२०२५ मध्ये आरोग्य सेवा, देशाची सुरक्षा, विज्ञान, शाश्वतता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन अशा १७ प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. एमआयटी-एडीटी विद्यापीठातील हार्डवेअर आवृत्तीमध्ये २००+ स्पर्धक आणि ३२+ मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. हा उपक्रम केवळ नावीन्यपूर्ण कल्पनांचा मेळावा ठरणार नाही, तर सरकारी अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात थेट संवाद घडवून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्राधान्यक्रमांसाठी उपाय विकसित करण्यासाठी प्रेरित करेल, अशी माहिती डाॅ.टिकेकर व प्रा.कापरे यांनी दिली.

Post a Comment
0 Comments