मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणेः सनई-चौघड्यांच्या मंजुळ स्वर, तुतारीच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, मर्दानी खेळ 'छत्रपती शिवाजी महाराज की जय!' 'जय भवानी, जय शिवराय!' घोषणांचा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२वी जयंती साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असणारा भगवा ध्वज फडकावून जयंती उत्सवास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी एमआयटी 'मिटकाॅम'च्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, परीक्षा विभाग संचालक डाॅ.ज्ञानदेव निलवर्ण, डाॅ.विरेंद्र शेटे, डाॅ.अतुल पाटील, डाॅ.अंजली भोईटे, डाॅ.सुराज भोयार यादी उपस्थित होते.
याप्रसंगी, लोणी-काळभोर व कदमवाक वस्ती ग्रामपंचायत येथील नागरिक, 'एमआयटी-एडीटी'चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या समोर विद्यार्थी अभिमन्यू पाटीलने शिवरायांवरील कविता व राजेश्वरी निंबाळकरने पाहाडी आवाजात केलेले भाषण व जयपाल यादव यांच्या शिवगर्जनेमुळे उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक नृत्य व मैदानी खेळांची प्रात्याक्षिके देखील दाखवण्यात आली. शिवरायांची पालखीसह मिरवणूक व त्यानंतर अश्वारूढी पुतळ्याला क्रेनद्वारे पुश्वहार अर्पण केल्यानंतर महाराजांची आरती करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी बोलताना, प्रा.डाॅ.कराड म्हणाले की, माझ्या ऑफिस मध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांच्या मूर्ती पुढे नतमस्तक होऊन दिनक्रम सुरू करतो. कारण छत्रपती शिवराय हे उर्जेचा प्रचंड मोठा स्त्रोत आहेत. आयुष्यात कितीही मोठ्या समस्या, संकटे आली तरी शिवचरित्र वाचल्यास त्यावर मार्ग सापडतो. त्यामुळे शिवराय आपल्यातच आहेत व ते आज ३९२ वर्षांचे झाले असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे शिवछत्रपतींचे गुण आत्मसात करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करणे हीच खरी शिवजयंती असेल, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
*चौकट*
*रक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद*
शिवजयंतीच्या पार्श्वभूमिवर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व ऐतिहासिक शस्त्रास्त्र प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरात तब्बल २५० दात्यांनी रक्तदान केल्याने हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले. विद्यापीठाच्या नवीन आयटी इमारतीच्या प्रवेशद्वारावर या दोन्ही उपक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन 'एमआयटी-मिटकाॅम'च्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, लोणी-काळभोर पोलिस स्टेशनचे पीआय शशिकांत चव्हाण, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. 'एमआयटी-एडीटी'च्या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरासारखे सामाजिक उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.




Post a Comment
0 Comments