मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे: श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध वारश्याची साक्ष देणारा 'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४' थाटामाटात पार पडला. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय महोत्सवाला राज्य आणि देशभरातून २५ हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती निमित्त या महोत्सवाची सुरुवात दि. 17 फेब्रुवारी रोजी संस्कृती आणि इतिहासाचे केंद्र बनून नटलेल्या जुन्नर शहरात झाला. उद्घाटनाचा दिवस किल्ले शिवनेरी येथे महादुर्ग फोर्ट वॉक यासोबत ॲडवेंचर झोन आणि झिपलाईन एरिना मधील साहसी प्रात्यक्षिके, ऐतिहासिक वारसा दाखवून देणारा किल्ले जुन्नर येथील हेरिटेज वॉक, बुट्टे पाटील मैदानात वसलेल्या फूड डिस्ट्रिक्ट मधील मन तृप्त करणारा असा खाद्य महोत्सव, साहस आणि आराम यांचा संगम साधणारा टेन्ट सिटी आणि वॉटर स्पोर्ट्स तसेच बुट्टे पाटील मैदानातील सभास्थळी होत असलेले सांस्कृतिक कार्यक्रम यांनी भारून गेला. शाहीर सुरेश जाधव यांची पोवाडा स्वरूपातील 'शिवमहावंदना' आणि छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्र गाथा असलेले आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य 'जाणता राजा' हे उद्घाटन सोहळ्याचे विशेष केंद्रबिंदू ठरले.
दि.18 आणि 19 फेब्रुवारी रोजी देखील स्वराज्य महोत्सव 2024 मध्ये विविध उपक्रम आणि अनुभव पहायला मिळाले ज्यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची साक्ष दिली. उत्साहवर्धक मॅरेथॉन स्पर्धा, ॲडवेंचर झोन मधील प्रात्यक्षिके, मनमोहक हेरिटेज वॉक आणि विस्मयकारक सांस्कृतिक सादरीकरणांचा आस्वाद उपस्थित पर्यटकांना घेता आला. महोत्सवाचा प्रत्येक दिवस हा अविस्मरणीय आणि रोमांचक असा सोहळाच ठरला. यात भर पडली ती पाहुणे आणि पर्यटक यांना वेगळा अनुभव देणाऱ्या कृषी पर्यटनाची.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरवीला साजेशी मानवंदना देत 19 फेब्रुवारी रोजी या महोत्सवाची सांगता झाली. दिवसाची सुरुवात किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याने झाली. यानंतर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारश्याची अनुभूती देणारे हेरिटेज वॉक आणि साहसी प्रत्यक्षिके पर्यटकांना अनुभवायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा कथन करणारी महाशिव आरती आणि शिव सह्याद्री द्वारा प्रस्तुत शिवशंभु शौर्य गाथा हे कार्यक्रम सांगता सोहळ्याचे आकर्षण बिंदू ठरले.
या कार्यक्रमाला विघ्नहर साखर कारखाना जुन्नर आंबेगावचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य आशाताई बुचके, सभापती संजय काळे,उपसभापती प्रकाश ताजणे, नगराध्यक्ष जुन्नर नगरपरिषद शामराव पांडे, उपनगराध्यक्ष दिनेश परदेशी, पर्यटन संचालक डॉ. बी एन पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपाधीक्षक रवींद्र चौदर, पुणे विभागाच्या पर्यटन उपसंचालक शमा पवार ढोक, तहसीलदार जुन्नर रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, पुरातत्त्व विभाग बाबासाहेब जंगले इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.हिंदवी स्वराज्य महोत्सवामध्ये सहकार्य केल्याबद्दल विविध संस्था व मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
पर्यटन मंत्री गिरीष महाजन म्हणाले की,
हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 ला मिळालेला दणदणीत प्रतिसाद राज्याची वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा अधोरेखित करणारा ठरला आहे महाराष्ट्राचे सर्वोत्तम पैलू जगासमोर आणण्यासाठी शासन आपली साहित्य आणि संस्कृती जपण्यासाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचा हा पुरावा आहे.
पर्यटन सचिव जयश्री भोज म्हणाल्या की,
हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारश्याचा सोहळा ठरला. सर्व उपस्थित मान्यवर व पर्यटक, आयोजक, व्यवस्थापक आणि स्वयंसेवक यांनी या महोत्सवात अत्यंत चांगला सहभाग घेतला. पर्यटन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाला सर्वांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल आभार मानते आणि भविष्यातही अशाच उत्स्फूर्त प्रतिसादाची आशा करतो. सर्व सर्व लोकप्रतिनिधी,स्थानिक प्रशासन आणि नागरिक पर्यटन प्रेमी या सर्वांचे मी आभार मानते.
पर्यटन संचालक डॉ. बी. एन.पाटील म्हणाले की, हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 हा महोत्सव अविस्मरणीय बनवण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. भविष्यातही पर्यटन विभागामार्फत या ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. या महोत्सवासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकंडवार, जिल्हाधिकारी पुणे डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषद पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण,पुणे विभागाच्या पर्यटन उपसंचालक शमा पवार आणि स्थानिक प्रशासन सर्व नागरिक, पर्यटन महोत्सवासाठी सर्व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मंडळींचा लाभलेला प्रतिसादाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.



Post a Comment
0 Comments