Type Here to Get Search Results !

२८० बिलियन डॉलर्सचे 'पुणे ग्रोथ हब' हेच आमचे व्हिजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला पुण्याच्या विकासाचा 'रोडमॅप'

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे : "पुणे हे केवळ एक शहर नसून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. राज्याच्या ५८० बिलियन डॉलर जीडीपीमध्ये पुण्याचा वाटा ७८ बिलियन आहे, तो २८० बिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी आम्ही 'पुणे ग्रोथ हब' ही संकल्पना राबवत आहोत. पुण्याचा विस्तार, संधी आणि वाढते नागरीकरण लक्षात घेऊन पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसराचा एकात्मिक विकास केला जाईल," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित 'संवाद पुणेकरांशी' या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे या वेळी उपस्थित होते. अभिनेत्री गिरीजा ओक यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. 




मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “देवाभाऊ काही बोलत नाही, देवभाऊचे काम बोलते.” पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती झालेली नाही. एकमेकांवर टीका न करण्याचे ठरले होते, मात्र विरोधकांचा संयम ढळत आहे. केवळ मोफत घोषणा करून निवडणूक जिंकता येत नाही, असे सूचक विधान करत त्यांनी मोफत विमान प्रवास किंवा मोफत तिकिटांच्या घोषणांवर टीका केली.

मेट्रो प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मेट्रो ही केवळ राज्याची नसून केंद्राचीही योजना आहे. तिकीट दर ठरविण्याचे अधिकार तिकीट समन्वय समितीकडे असतात. पुणेकरांना मोफत सेवा नको, तर दर्जेदार मेट्रो व बससेवा हवी असून त्यासाठी योग्य शुल्क देण्याची तयारी आहे. नागपूर मेट्रोच्या तुलनेत पुणे मेट्रोला सुरुवातीला वादाचा सामना करावा लागला; मात्र निर्णय घेऊन काम वेगाने सुरू करण्यात आले. आरे कॉलनीतील मेट्रो कामाला स्थगिती दिल्यामुळे प्रकल्प तीन वर्षे रखडला व सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाला, असेही त्यांनी सांगितले.

पुणे ५०० चौरस किमी क्षेत्रफळावर पसरले असून, येथे केवळ ९ टक्के रस्ते आहेत. ३२ प्रमुख रस्त्यांवर क्षमतेपेक्षा अडीच पट रहदारी आहे. यावर 'पाताळलोक' विकसित करणे आवश्यक आहे. त्या अंतर्गत शहरात ५६ किमी लांबीचे भुयारी मार्ग आणि २३ उड्डाणपूल साकारण्यात येत आहेत. त्यासाठी ३२ हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. पुण्यात १०० किमीचे मेट्रो जाळे उभारले जात आहे. तसेच मेट्रो आणि पीएमपीसाठी 'सिंगल तिकीट' प्रणाली लागू केली जाईल. सध्याच्या १ हजार ई-बसची संख्या ५ हजारांपर्यंत नेऊन 'एन्ड टू एन्ड' कनेक्टिव्हिटी दिली जाईल. पुणे रिंग रोडमुळे शहरातील ४० टक्के वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"पुणेकर जास्त पाणी वापरतात असे म्हटले जाते, पण खरी समस्या ४० टक्के होणारी गळती आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले. समान पाणीपुरवठा योजनेचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून, यामुळे जुन्या वाहिन्या बदलून वितरण व्यवस्था उत्तरदायी केली जाईल. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि पाण्याचे नवीन नैसर्गिक स्त्रोत शोधण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.




पुण्यातील टेकड्यांबाबत भूमिका स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले, "टेकड्या हिरावल्या जाणार नाहीत, तर तेथील अतिक्रमणे हटवून पुनर्वसन केले जाईल. 'बीडीपी' झोनमध्ये धोरण नसल्याने ३० टक्के अतिक्रमणे झाली आहेत. तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून, डोंगर आणि जैवविविधता १०० टक्के वाचवूनच पुण्याचा शाश्वत विकास केला जाईल."

गुन्हेगारांची जागा तुरुंगातच!

तिकीट वाटपावरून त्यांनी मित्रपक्षांचे कान टोचले. "निवडून येण्याची क्षमता महत्त्वाची असली तरी गुन्हेगारांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देणे पुणेकरांना रुचणारे नाही. गुन्हेगार निवडून आले तरी त्यांची जागा महापालिकेत नव्हे, तर तुरुंगातच असेल. मी गृहमंत्री म्हणून पुण्याची गुन्हेगारी मोडून काढल्याशिवाय राहणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.

चांगल्या नेत्याची व्याख्या

सध्याच्या राजकारणात तिकीट वाटप करताना निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षा निवडून येण्याची क्षमता असलेला कार्यकर्ता अधिक महत्त्वाचा ठरत असल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. यामुळे काही जण नाराज होतात, दुरावतात; मात्र सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा माझा प्रयत्न असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. चांगला नेता तोच असतो जो पुढील २० वर्षांचा विचार करून अनेकांना प्रेरणा देतो आणि सामावून घेतो, असे मतही त्यांनी मांडले.

Post a Comment

0 Comments