मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे, ता. ४ - पुण्यात नुकत्याच सुरू झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवामुळे क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंमध्ये एक नवा उत्साह संचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया संकल्पनेला प्रतिसाद देऊन केंद्रिय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने खासदार क्रीडा महोत्सव सुरू आहे.
खासदार क्रीडा महोत्सवात एकूण ३५ क्रीडा प्रकारांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे पुणेकरांना एकाच वेळी विविध खेळांचा थरार अनुभवण्याची संधी मिळत आहे. हा महोत्सव केवळ खेळांची स्पर्धा नसून, तो पुणे शहरातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणारा एक महत्त्वाचा सोहळा बनला आहे. शहराच्या विविध भागांतील मैदानांवर खेळाडूंचा मोठा सहभाग दिसत आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण ते अगदी अनुभवी खेळाडूंपर्यंत सर्वच वयोगटांतील खेळाडू मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाले आहेत.
क्रिकेट, कबड्डी, खो-खो अशा लोकप्रिय खेळांसोबतच अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, शरीरसौष्ठव आणि योगासारख्या विविध खेळांना पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सकाळपासूनच शहरातील मैदाने खेळाडूंच्या गर्दीने फुलून जातात. विजयाचा जल्लोष, खेळाडूंचे प्रोत्साहनपर नारे आणि प्रेक्षकांची टाळ्यांची साथ यामुळे वातावरण खूप उत्साहाचे बनले आहे.
या महोत्सवामुळे अनेक स्थानिक व नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी एक मोठे आणि दर्जेदार व्यासपीठ मिळाले आहे. अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंशी संवाद साधून मार्गदर्शन मिळवताना दिसत आहेत. प्रत्येक सामन्यात चुरस असली तरी, खेळाडू उत्कृष्ट खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवत आहेत. विजयानंतर प्रतिस्पर्ध्याला दिलेली दाद आणि पराभवानंतर पुन्हा तयारी करण्याची जिद्द दिसून येत आहे.
खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून आयोजित या महोत्सवामुळे पुणे शहर खऱ्या अर्थाने खेळमय झाले आहे. स्पर्धा आयोजनाचा हाच हेतू मोहोळ यांचा आहे. स्थानिक नेत्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वच जण या सोहळ्यात सहभागी होऊन खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. ३५ खेळांच्या स्पर्धा असल्याने, जवळपास प्रत्येक पुणेकराला त्याच्या आवडीच्या खेळाशी जोडले जाण्याची संधी मिळणार आहे.
रोख पारितोषिकामुळे मोठी स्पर्धा
या स्पर्धेत प्रत्येक क्रीडा प्रकारात विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक, मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक दिले जात आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत मोठी चुरस बघायला मिळत आहे. याबाबत मोहोळ म्हणाले, स्पर्धेसोबतच खेळाडूंना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून खेळाडूंना ही रक्कम त्यांच्या खेळासाठी वापरता येईल आणि नवोदित खेळाडूंना प्रोत्साहनही मिळेल. मॅरेथॉनमधील विजेत्यास आपण एक लाख रुपयाचे, तर उपविजेत्यास ७५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले. खेळासाठीच्या आवश्यक सर्व सुविधा आपण पुरविल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.


Post a Comment
0 Comments