मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
दिनांक: 21 नोव्हेंबर 2025
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या वेळेत थंडीचे प्रचंड प्रमाण वाढले असून तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येत आहे. या अत्यंत कमी तापमानात लहान मुलांना वेळेवर उठणे, तयार होणे आणि सकाळी ७:३० वाजेपर्यंत शाळेत पोहोचणे मोठे आव्हान बनले आहे. विशेषतः खडकी परिसरातील शाळांमध्ये सकाळच्या वेळेस अनुसरला जाणारा कडक गेट-बंद धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षा दोन्ही धोक्यात येत असल्याची गंभीर बाब मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन, पुणे यांनी पुढे आणली आहे.
खडकीतील St. Joseph’s Boys High School आणि St. Joseph’s Girls High School या दोन्ही शाळांबाबत पालक व रहिवाशांकडून अशी वारंवार तक्रार समोर आली आहे की शाळेची अधिकृत वेळ ७:३० असली तरी प्रत्यक्षात गेट ७:४० ते ७:४५ च्या दरम्यान बंद केले जाते. थंडी, धुके, वाहतूक व सकाळच्या अटळ अडचणींमुळे काही विद्यार्थ्यांना काही मिनिटांचा उशीर झाल्यास त्यांना शाळेत प्रवेश नाकारला जातो आणि अनेक मुलांना पुन्हा घरी परत जावे लागते. या परत जाण्याच्या प्रवासात मुलांची सुरक्षा धोक्यात येते, आणि हा धोका मुलींकरिता तर आणखीच गंभीर ठरतो.
वाढत्या मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना, रिक्षा व कॅब चालकांकडून मुलींशी केलेल्या गैरवर्तनाच्या तक्रारी, तसेच महाराष्ट्रातीलच काही ठिकाणी घडलेल्या शाळा-कर्मचाऱ्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांच्या घटना लक्षात घेता, अशा वयाच्या मुलींना सकाळच्या वेळी एकट्याने परत पाठवणे हे अत्यंत धोकादायक आहे. फाउंडेशनच्या निरीक्षणात असेही आले की काही लहान मुलगे गेटबाहेर रस्त्यावर उभे राहतात, त्यांच्या सोबत कोणीही प्रौढ पर्यवेक्षण नसते, आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनतो.
या परिस्थितीत, मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन, पुणे यांनी स्पष्ट केले की महाराष्ट्र शासनाने मा. माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात शाळांच्या सकाळच्या वेळेबाबत अधिक लवचिकता ठेवावी, हवामान किंवा वाहतूक यामुळे उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना त्रास देऊ नये असा स्पष्ट मार्गदर्शक आदेश जारी केला होता. या निर्देशांचा उद्देश मुलांच्या आरोग्याचा, सुरक्षिततेचा आणि शिक्षणाचा समतोल राखणे हा होता; परंतु खडकीतील दोन्ही शाळांमध्ये या सूचनांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.
या संदर्भातील वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन फाउंडेशनने आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी या गंभीर मुद्द्यावर तातडीने पावले उचलत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. शिक्षण मंत्री, मा. शिक्षण आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद पुणे, उपसंचालक शिक्षण, तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना अधिकृत ई-मेलद्वारे संपूर्ण माहिती पाठवून त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली आहे. या पत्रव्यवहारात फाउंडेशनने स्पष्ट केले आहे की शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन सकाळच्या वेळेत लवचिकता द्यावी, अत्यंत थंडीच्या काळात गेट बंद करण्याच्या धोरणाचा पुनर्विचार करावा, आणि कोणत्याही परिस्थितीत मुलांना—विशेषतः मुलींना एकट्याने घरी परत पाठवू नये.
फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. फरहा अन्वर हुसैन शेख यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले:
*“शाळेतील शिस्त आम्हाला मान्य आहे, पण थंडी, वाहतूक आणि मुलांच्या नैसर्गिक मर्यादा समजून न घेता त्यांना गेटवरून परत पाठवणे ही विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आणि धोकादायक जबाबदारी लादण्यासारखे आहे. मुलांचे शिक्षण, त्यांची सुरक्षा आणि त्यांचे मानसिक आरोग्य हे कोणत्याही वेळेच्या नियमांपेक्षा खूप महत्त्वाचे आहे.”*
मिस फरहा फाउंडेशनने शासन व शिक्षण विभागाकडे विद्यार्थ्यांच्या हितासाठी तातडीने चौकशी करून योग्य निर्देश जारी करावेत अशी मागणी केली असून, शहरातील पालकांनीदेखील मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या विषयाला गंभीरतेने पाहण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment
0 Comments