Type Here to Get Search Results !

सिंहगड रस्ता परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या धडकेत एका महाविद्यालयीन युवतीचा दुर्दैवी मृत्यू

 


अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे


पुणे..प्रतिनिधी...

सिंहगड रस्ता परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या धडकेत एका महाविद्यालयीन युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तुकाईनगर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, निष्पाप विद्यार्थिनीचा जाण्यास जबाबदार असलेल्या ट्रक चालकाविरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या अपघातात मृत्युमुखी पडलेली विद्यार्थिनी सई श्रीकांत भागवत (वय १९, रा. भन्साळी कॅम्पस, तुकाईनगर, वडगाव बुद्रुक) ही एस.पी. महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. गुरुवारी, २६ जून रोजी दुपारी ती कॉलेजहून दुचाकीवरून घरी परतत असताना तुकाईनगर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील तुकाईनगरजवळ सई आपल्या दुचाकीवरून जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने तिला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ती रस्त्यावर जोरात फेकली गेली आणि तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली. अपघात इतका भीषण होता की, आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. 

त्याच वेळी या घटनेची माहिती पोलिसांना दिली गेली. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त अजय परमार, तसेच सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी अवस्थेत सईला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. 

या अपघातामुळे भागवत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, सईच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. सई ही अत्यंत हुशार, मनमिळावू आणि अभ्यासू विद्यार्थिनी होती, असे तिच्या शिक्षकांनी सांगितले. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असून, तिच्या अचानक जाण्याने कुटुंबावर कोसळलेले दुःख अवर्णनीय आहे. या प्रकरणी सईची आई दीपश्री श्रीकांत भागवत (वय ४८) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ट्रक चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिस उपनिरीक्षक कांजळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments