मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे : भारदस्त आवाजातील शिवगर्जना.., चित्तथरारक लाठी - काठीचे प्रात्यक्षिक..अफजल खानाचा वध डोळ्यांसमोर उभा करणारा पोवाडा अन् शिवाजी महाराज की जय .. च्या जयघोषात पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ ( माई ) यांच्या 'सप्तसिंधु' महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित सन्मति बाल निकेतन, मांजरी येथे शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या नियोजना पासून सजावट, पाहुण्यांचे स्वागत, सूत्रसंचलन, शिवगर्जना, भाषणं, नृत्य ते आभार प्रदर्शना पर्यंत सर्वकाही येथील बाल सहभागातूनच झाल्याने हा शिवजयंती सोहळा विशेष कौतुकाचा ठरला.
या शिवमय कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून झाली. यावेळी सन्मती बाल निकेतनच्या अध्यक्षा ममता सिंधुताई सपकाळ, सचिव सीमा घाडगे, समूपदेशक दिनेश शेटे, प्रतिभा झाडे, सी एस आर विभागाच्या मनीषा नाईक आदी उपस्थित होते. या प्रसंगी शिवम, प्रीतम, केदार,अथर्व, नैतिक, अथर्व, राजवीर, संभव या मुलांनी पोवाडा व नृत्य सादरीकरण केले. तर राजवीर, ओम, युवराज, राजेश व प्रीतम यांनी भाषणं केली. आपल्या भारदस्त आवाजात माधवने शिव गर्जना सादर केली.
संपूर्ण सजावटीची जबाबदारी ही सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रतिकने सांभाळली. तसेच फोटोग्राफी प्रदीपने तर साउंड सिस्टीमचे नियोजन गोविंदाने पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवनने तर आभार प्रदर्शन रुपेशने केले. यासर्व कार्यक्रमासाठी वेदिका ठाकूर यांनी सर्व मुलांना मार्गदर्शन केले.
बाल सहभागातून शिवजयंती साजरी झाल्याने, बाल वयातच मुलांना शिवरायांचे महत्व त्यांच्या प्रती असलेल्या आदराची जाणीव करून देत आहे, अशा भावना ममता सिंधुताई सपकाळ यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Post a Comment
0 Comments