Type Here to Get Search Results !

सामाजिक भान असणाऱ्या तरुणांची समाजाला गरज* *'सामाजिक चळवळ आणि तरुण' विषयावरील चर्चासत्रात मान्यवरांचे मत ; जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आयोजित ७ वी युवा संसद*

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज



पुणे : एका हातामध्ये मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट अशी सध्याच्या तरुणांची अवस्था झाली आहे. मोबाईल आणि टीव्हीच्या आभासी जगामध्ये रमणारे तरुण अधिकाधिक आत्ममग्न होत आहेत, असे तरुण सामाजिक चळवळ उभी करू शकणार नाहीत. स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करणाऱ्या सामाजिक भान असणाऱ्या तरुणांची समाजाला गरज आहे, असे मत सामाजिक चळवळ आणि तरुण या विषयावरील चर्चासत्रामध्ये मान्यवरांनी व्यक्त केले. 



जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे न-हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ७ युवा संसदेमध्ये 'सामाजिक चळवळ आणि तरुण' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आदी सहभागी झाले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते.


रूपाली चाकणकर म्हणाल्या, समाजाची सद्यस्थिती लक्षात घेतली तर आजही सामाजिक लढा अपूर्ण आहे. आपण वैज्ञानिक दृष्ट्या चंद्रावर पोहोचलो, परंतु जमिनीवरील प्रश्न तसेच आहेत, याची खंत तरुणांना वाटली पाहिजे. आज समाजातील संवाद तुटल्यामुळे सामाजिक चळवळ उभी राहणे अवघड आहे. यासाठी तरुणांनी मोबाईल आणि टीव्हीच्या आभासी जगातून बाहेर आले पाहिजे. प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळले तर त्यांना तळागाळातील प्रश्न समजू शकतील आणि त्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे तरुण निर्माण होऊ शकतील. 



सुरेश खोपडे म्हणाले, मुंबईतील भिवंडी येथे पोलीस अधिकारी म्हणून काम करताना हिंदू मुस्लिम सलोखा निर्माण करण्यासाठी मी मोहल्ला कमिटीची स्थापना केली. त्यातून मला समाजाचे आणि तळागाळातील प्रश्न समजले. आज सामाजिक चळवळी केवळ वरवरचा विचार करून निर्माण केल्या जातात. परंतु समाजाच्या मूळ समस्या दूर करण्यासाठी सखोल अभ्यास करून चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. 


प्रवीण गायकवाड म्हणाले, संकटामध्ये संधी शोधतो तो खरा नेता असतो. राजकारण आणि समाजकारण हे सध्या संभ्रमित अवस्थेमध्ये आहे. अशावेळी महाराष्ट्रामध्ये व्यापक चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. आज पैसा असणाऱ्या व्यक्ती समाजामध्ये प्रतिष्ठा मिळावी म्हणून राजकारणात येतात. यातून केवळ गुंठामंत्री निर्माण होतात, समाजासाठी तळमळ असणाऱ्या व्यक्ती मात्र निर्माण होत नाहीत आणि समाजाच्या समस्या तशाच राहतात. समाजाच्या समस्या  नष्ट करण्यासाठी त्या संदर्भात तळमळ असणाऱ्या व्यक्ती जर निर्माण झाल्या तर खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळी निर्माण होऊ शकतील.


* फोटो ओळ - जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे न-हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ७ युवा संसदेमध्ये 'सामाजिक चळवळ आणि तरुण' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी मान्यवरानाचा सन्मान करताना संस्थेचे प्रमुख.

Post a Comment

0 Comments