Type Here to Get Search Results !

PMPML बसमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नगरविकास सचिव व पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन*



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे दि.३१: पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) च्या बसमध्ये अल्पवयीन मुलींना छेडछाड आणि विनयभंग करण्याच्या दोन धक्कादायक घटना नुकत्याच समोर आल्या आहेत. सहकारनगर आणि सिंहगड रोड परिसरात २६ आणि २८ मार्च २०२६ रोजी घडलेल्या या घटनांमध्ये संबंधित वाहकांनी मुलींकडे मोबाईल क्रमांक मागितला. नकार दिल्यानंतर त्यांनी अश्लील स्पर्श करून विनयभंग केला. दोन्ही प्रकरणांत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि POCSO कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


या घटनेची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नगरविकास सचिव आणि पुणे महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी महिला, विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे स्पष्ट केले आहे.


डॉ. गोऱ्हे यांनी भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी, PMPML मधील सर्व कंत्राटी आणि कायमस्वरूपी चालक-वाहकांची पोलीस प्रशासनामार्फत सखोल चारित्र्य पडताळणी (Police Verification) बंधनकारक करणे. वाहकांची शारीरिक तपासणीसोबत मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सायकॉलॉजिकल टेस्ट घेणे. सर्व बसमधील सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास कार्यान्वित ठेवणे; ज्या बसमध्ये कॅमेरे नाहीत तेथे तातडीने बसविणे. बसमध्ये महिलांसाठी राखीव जागांची सुरक्षितता आणि आपत्कालीन मदतीसाठी पॅनिक बटण यंत्रणा सक्षम करणे या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी केली आहे.


डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात म्हटले आहे की, “या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाने संबंधित विभागाला सक्त सूचना द्याव्यात.”

------

Post a Comment

0 Comments