मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे...
हडपसर मतदारसंघातील एनआयबीएम रस्त्यावरील दोराबजी मॉल परिसरात पुणे महानगरपालिकेने पाणीटंचाईवर उपाय म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या भव्य पाण्याच्या टाक्या गैरप्रकारांसाठी वापरल्या जात आहेत, हडपसर मतदार संघातील व परिसरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी उभारलेल्या या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये आजपर्यंत नियमित पाणीपुरवठा सुरू झालेला नाही, ही वस्तुस्थिती जितकी गंभीर आहे तितकीच धक्कादायक बाब म्हणजे या टाक्यांचा सध्या उघडपणे गैरवापर सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या टाक्यांमध्ये तात्काळ पाणीपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी शिवसेनेने “भव्य हंडा मोर्चा” काढत पुणे महानगरपालिका प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी स्वतः पुणे महानगरपालिका आयुक्त मा. नवलकिशोर राम साहेब यांनी लक्ष घालून परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजपर्यंत त्याचे कोणतेही ठोस परिणाम दिसून आलेले नाहीत.
या भल्या मोठ्या टाक्यांवर बिनदिक्कतपणे तरुण-तरुणी चढून व्हिडिओ शूटिंग करताना, तसेच विविध अशोभनीय प्रकार करताना सातत्याने आढळून येत आहेत. दिवसाढवळ्या सुरू असलेला हा प्रकार केवळ सार्वजनिक शिस्तभंग नाही, तर थेट कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा आहे. या परिसरात ना कुठले सुरक्षारक्षक, ना सीसीटीव्ही कॅमेरे, ना कोणतीही देखरेख – अशा पूर्णपणे मोकळ्या आणि असुरक्षित वातावरणात ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच तीव्र झाला असून, उद्या एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, हा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिक, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वारंवार निवेदने देऊन, आंदोलने करून आणि प्रशासनाचे लक्ष वेधूनही पुणे महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसून येते. प्रत्यक्ष पुरावे समोर येत असतानाही कोणतीही कारवाई न करणे, ही केवळ निष्क्रियता नसून प्रशासनाच्या उदासीनतेचा कळस आहे. जनतेच्या पैशातून उभारलेले कोट्यवधींचे प्रकल्प अशा प्रकारे वाऱ्यावर सोडणे, ही पुणे महानगरपालिकेच्या कारभारावरची गंभीर शंका निर्माण करणारी बाब आहे.
आता तरी पुणे महानगरपालिकेने या टाक्यांवर तात्काळ सुरक्षा व्यवस्था उभारावी, कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमावेत, सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या टाक्यांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू करून त्यांचा मूळ उद्देश पूर्ण करावा, अशी तीव्र मागणी होत आहे. अन्यथा, शिवसेनेच्या वतीने यापेक्षाही अधिक आक्रमक आणि व्यापक आंदोलन उभारण्यात येईल. नागरिकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या प्रकल्पांमध्ये असा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, आणि उद्या कोणतीही गंभीर घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पुणे महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणांवरच राहील

Post a Comment
0 Comments