Type Here to Get Search Results !

जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक-डॉ.हुलगेश चलवादी* *पुरोगामी महाराष्ट्रात श्रद्धेच्या नावाखालील फसवणूक थांबवण्याचे आवाहन*



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


 पुणे: प्रतिनिधी..


संतांची आणि समाजसुधारकांची भूमी असलेल्या महाराष्ट्राने देशाला पुरोगामी विचारांची दिशा दिली.मात्र,आजही विज्ञानाच्या युगात अनेक नागरिक श्रद्धेच्या नावाखाली ढोंगी बाबा आणि मांत्रिकांच्या जाळ्यात अडकून स्वतःचे आर्थिक, शारिरिक आणि मानसिक नुकसान करून घेत आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. नागरिकांनी देव, धर्मावर श्रद्धा जरूर ठेवावी, पण अंधश्रद्धेला बळी पडू नये, असे आवाहन राज्यात गाजत असलेल्या 'कॅप्टन' प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बहुजन चळवळीतील नेते व माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी शनिवारी (ता.२१) केले. राज्यात अस्तित्वात असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.


राज्यात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात असूनही हजारो गुन्हे दाखल होणे आणि शेकडो ढोंगी बाबांना अटक होणे हे दर्शवते की, समाज अजूनही या भोंदूगिरीच्या विळख्यात आहे. भक्ती, श्रद्धा ही वैयक्तिक बाब आहे; परंतु, जेव्हा एखादा व्यक्ती चमत्काराचा दावा करून तुमचे आजार बरे करण्याचे, गुप्तधन मिळवून देण्याचे, पैशांचा पाऊस पाडण्याचे किंवा संकट दूर करण्याचे आमिष दाखवतो, तेव्हा ती शुद्ध फसवणूक असते. अशा भोंदूगिरीला नागरिकांनी थारा देऊ नये, असे आवाहन देखील डॉ.चलवादी यांनी केले.


केवळ गुन्हे दाखल करून अंधश्रद्धा निर्मूलन होणार नाही. राज्य सरकारने तालुका,गाव पातळीवर मोठ्या प्रमाणावर 'जनजागृती अभियान' राबवण्याची गरज आहे. शाळा-महाविद्यालयांमधून वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे दिले पाहिजे.ढोंगी बाबांना आणि मांत्रिकांना कायद्याचा धाक वाटला पाहिजे. अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करून समाजात एक आदर्श निर्माण करणे गरजेचे असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला तर्कशुद्ध विचार करायला शिकवले. स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा, कोणत्याही मांत्रिकाच्या शब्दावर नाही.आपल्या राज्याला पुरोगामी म्हणवून घेताना जर आजही लोक बाबा-बापूंच्या नादाला लागून उद्ध्वस्त होत असतील, तर ते आपल्या सर्वांचे वैचारिक अपयश आहे. सर्वांना मिळून एक वैज्ञानिक-विवेकनिष्ठ समाज घडण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

-----

Post a Comment

0 Comments