मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
*हडपसर परिसरातील जळीतग्रस्तांनाही मदत द्यावी – शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची मागणी*
पुणे : खराडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी लागलेल्या भीषण आगीत बाधित झालेल्या ९० कुटुंबांना प्रत्येकी ११ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला असून या निर्णयाबद्दल शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी स्थायी समिती अध्यक्षांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
आपत्तीग्रस्त नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी घेतलेला हा निर्णय अत्यंत संवेदनशील व स्तुत्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याच पार्श्वभूमीवर भानगिरे यांनी हडपसर परिसरातील विविध आगीच्या घटनांकडे लक्ष वेधले आहे. राममनोहर लोहिया गार्डन परिसरातील झोपडपट्टी भाग, कृष्णानगर स्मशानभूमी परिसरातील गोदाम तसेच मगरपट्टा परिसरातील झोपडी भागात सिलेंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित कुटुंबांची घरे जळून खाक झाली असून त्यांच्या घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले आहे. याशिवाय काही ठिकाणी नागरिक जखमी होण्याच्या घटना देखील घडल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
या सर्व घटनांमुळे बाधित कुटुंबांवर मोठे आर्थिक व मानसिक संकट ओढवले असून त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता स्वतःच्या खर्चाने पुनर्वसन करणे अत्यंत कठीण झाले आहे. महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये नैसर्गिक व अनैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी निधीची तरतूद उपलब्ध असताना हडपसर परिसरातील या जळीतग्रस्त नागरिकांनाही खराडीप्रमाणेच आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे.
तसेच संबंधित बाधित कुटुंबांचे प्रशासनामार्फत तातडीने सर्वेक्षण करून त्यांना आर्थिक मदत मंजूर करावी, यामुळे संकटग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळेल तसेच महानगरपालिकेची सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.



Post a Comment
0 Comments