मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे, भारत | 27 जानेवारी 2026 – शांतता आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, रोटरी ने सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (SIU) येथे पीस सेंटरचे उद्घाटन 26 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले.
रोटरी इंटरनॅशनल आणि सिम्बायोसिस यांच्या समान मूल्ये, दृष्टी, ध्येय आणि तज्ज्ञतेचा संगम असलेले हे पीस सेंटर पुणे येथील सिम्बायोसिसच्या निसर्गरम्य 400+ एकर विस्तारलेल्या लवळे कॅम्पसमध्ये कार्यरत आहे. या केंद्रामार्फत Peace and Development Studies या विषयात एक वर्षाचा पूर्णतः वित्तपुरवठा केलेला पदव्युत्तर डिप्लोमा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम विशेषतः आशिया किंवा आशियाई समुदायांमध्ये शांतता व विकासाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मिड-कॅरिअर व्यावसायिकांसाठी रचना करण्यात आला आहे.
रोटरी इंटरनॅशनल चे अध्यक्ष (2025–26) फ्रान्सिस्को अरेझो म्हणाले,
“आजच्या परस्पर जोडलेल्या जगात शांतता ही केवळ एक अमूर्त संकल्पना राहू शकत नाही. ज्ञान, नैतिक नेतृत्व आणि कृती यांचा संगम साधणाऱ्या संस्थांमधूनच शांततेची उभारणी करावी लागते. शिक्षणामुळे व्यक्तींना सीमांच्या पलीकडे सेवा करण्याची आणि विभाजनांच्या पलीकडे विचार करण्याची क्षमता मिळते. तेव्हाच शाश्वत शांतता शक्य होते, असा रोटरीचा ठाम विश्वास आहे.”
ते पुढे म्हणाले,
“सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये पीस सेंटरची स्थापना ही उद्दिष्ट समजून घेऊन प्रामाणिकपणे कार्य करणारे नेते घडविण्याच्या रोटरीच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. हे केंद्र केवळ आशियातील प्रादेशिक शांतता-निर्मितीतच नव्हे, तर सामूहिक जागतिक जबाबदारीसाठी अधिक मजबूत आंतरराष्ट्रीय चौकट उभारणीत मोलाचे योगदान देईल.”
सिम्बायोसिसच्या प्रिन्सिपल डायरेक्टर आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्रो-चॅन्सेलर डॉ. विद्या येरवडेकर म्हणाल्या,
“रोटरी येथे सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये पीस सेंटरची स्थापना ही सिम्बायोसिसच्या मूलभूत मूल्यांशी पूर्णतः सुसंगत आहे आणि आमच्या 55व्या वर्धापनदिनानिमित्त ती विशेष अर्थपूर्ण ठरते. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर प्रा. डॉ. एस. बी. मुजुमदार यांनी सिम्बायोसिस ची स्थापना केली. भारत आणि जगभरातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून आंतरराष्ट्रीय समज आणि बंधुभाव वाढविणे हेच आमचे ध्येय राहिले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हा आंतरराष्ट्रीय समज वृद्धिंगत करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.”
रोटरीच्या एसआययू येथील पीस सेंटरमध्ये दरवर्षी 40 पर्यंत रोटरी पीस फेलोज सहभागी होतील.
रोटरी फाउंडेशनचे (2022–2026) ट्रस्टी भरत एच. पंड्या म्हणाले,
“भारताची समृद्ध विविधता आणि गुंतागुंतीचा सामाजिक पट लक्षात घेता, सिम्बायोसिसमधील हे पीस सेंटर सहानुभूती आणि नवकल्पनांच्या माध्यमातून संघर्ष हाताळू शकणारे नेते घडविण्यासाठी अनोख्या संधी उपलब्ध करून देईल.”
ते पुढे म्हणाले,
“सिम्बायोसिससोबतच्या सहकार्यामुळे आम्ही असे व्यासपीठ निर्माण करीत आहोत, जिथे नवोदित आणि अनुभवी शांतता-निर्माते स्थानिक तसेच जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि नेटवर्क प्राप्त करू शकतील. हे केंद्र आशियामध्ये संवाद, समज आणि शाश्वत शांतता बळकट करण्यासाठी समर्पित असलेल्या नव्या पिढीतील नेत्यांना घडविण्यात मदत करेल.”
रोटरी येथे सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतील एक वर्षाच्या पदव्युत्तर डिप्लोमा कार्यक्रमासाठी अर्ज 1 फेब्रुवारी ते 15 मे 2026 दरम्यान खुले राहतील. रोटरी पीस फेलोशिप कार्यक्रम आणि अर्ज प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी rotary.org/peace-fellowships या संकेतस्थळाला भेट द्यावी.
रोटरीच्या एसआययू येथील पीस सेंटरच्या सेंटर हेड डॉ. सुलक्षणा सेन म्हणाल्या,
“एसआययू येथील रोटरी पीस सेंटर व्यापक आशिया क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन स्थापन करण्यात आले आहे. येथे इंटर-डिसिप्लिनरी दृष्टिकोन आणि अनुभवाधारित शिक्षण यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. हा एक वर्षाचा पदव्युत्तर डिप्लोमा कार्यक्रम ‘ब्लेंडेड लर्निंग’ स्वरूपात राबविण्यात येईल, ज्यामुळे शांतता आणि विकासाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मिड-लेव्हल व्यावसायिकांना आशियातील सामाजिक परिवर्तनासाठी शाश्वत आणि कृतीयोग्य परिणाम साधता येतील.”
सध्या रोटरी आपल्या आठ पीस सेंटर कार्यक्रमांद्वारे जगभरातील शांतता आणि विकास क्षेत्रातील नेत्यांना 170 पर्यंत पूर्णतः वित्तपुरवठा केलेल्या फेलोशिप्स प्रदान करते. 2002 पासून आजपर्यंत, रोटरी पीस सेंटर्सने 1,800 हून अधिक व्यक्तींना शांतता-निर्मिती क्षेत्रातील करिअरसाठी प्रशिक्षण दिले असून, हे माजी विद्यार्थी आज शासकीय व अशासकीय संस्था, आंतरराष्ट्रीय संघटना आणि इतर विविध ठिकाणी नेतृत्वाच्या भूमिका बजावत आहेत.


Post a Comment
0 Comments