Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? महार वतन जमीन व्यवहार प्रकरण; 'बीएसपी'चा फडणवीसांना थेट सवाल पार्थ पवारांसह सर्वांवर 'अक्ट्रोसिटी' दाखल करण्याची मागणी




मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


 ७ नोव्हेंबर २०२५, पुणे :- प्रतिनिधी


राज्याच्या सांस्कृतिक राजधानी पुण्यातील तथाकथित महार वतन जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांसह त्यांच्या सोबत संगनमत करणाऱ्या सर्वांवर अक्ट्रोसिटी दाखल करीत त्यांना अटक करावी तसेच या जमिनीचा व्यवहार रद्द करित ती मुळ मालकाला हस्तांतरित करा,अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी शुक्रवारी (ता.७) केली. पार्थ यांच्यावर पुणे पोलीस आयुक्तांनी कुठल्याही राजकीय दबावाला न जुमानता गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी देखील डॉ.चलवादी यांनी केली. संपूर्ण प्रकरणाची तक्रार 'एनसीएससी' कडे करणार असल्याचे देखील डॉ.चलवादी म्हणाले. यासंदर्भात डॉ.चलवादी यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.


पुण्यातील जवळपास हजार एकर जमीन महार वतनाची आहे.आम्हच्या पुर्वर्जांच्या शौर्याचे प्रतिक असलेल्या या जमिनी ​अशाचप्रकारे लाटण्यात आल्या. वानवडी, रावेत, वाघोली, वाकड, येरावडा, खराडी, वडगाव शेरी, घोरपडी, नायडू हॉस्पिटल, धानोरी, लोहगाव येथे महार वतनांच्या जमिनी आहेत.मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणात स्वत: लक्ष घालून या जमिनी मुळे मालकांना मिळवून देण्यासाठी विशेष समिती स्थापन करावी.गेल्या कित्येक दिवसांपासून बसप या मुद्दयावर लढा देत आहे.या जमिनी मुळ मालकांना ​हस्तांतरित केल्या नाहीत, तर सर्वोच्च न्यायालय,उच्च न्यायालयात दाद मागू ,असे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले.


पुण्यातील सर्व्हे नंबर ८८, मुंडवा ही जमीन महार वतनाची आहे.कायद्यानुसार या जमिनीची खरेदी-विक्री करता येत नाही. परंतु, जमिनीची खरेदी-विक्री करीत महार वतनदारांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घेणार का? असा सवाल डॉ.चलवादी यांनी उपस्थित केला.योग्य कारवाई केली नाही, तर बसपा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा देखील त्यांनी दिला.


महार वतनाच्या जमिनीसाठी बहुजनांनी संघटीत होऊन संघर्ष करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील सर्व महार वतनांच्या जमिनीचे पुन्हा सर्व्हेक्षण करीत लाटलेल्या जमिनी मूळ मालकांना हस्तांतरित करा तसेच पुणे शहर तहसीलदारांनी त्यांच्या कार्यकाळात महार, रामोशी आणि पाटील वतनासंदर्भात दिलेल्या आदेशांची सखोल चौकशी करा,अशी मागणी बसपा ने केली.

------------------------------

Post a Comment

0 Comments