Type Here to Get Search Results !

डॉ. शर्वरी इनामदार यांची जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी साऊथ आफ्रिका, केप टाऊन येथे क्लासिक व इक्विप्ड जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ४ सुवर्णपदके आणि मानाचा ‘बेस्ट लिफ्टर वर्ल्ड’चा तिसऱ्या क्रमांकाचा किताब पटकावला


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे : साऊथ आफ्रिका, केप टाऊन येथे क्लासिक व इक्विप्ड जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. जगभरातील सुमारे ४८० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी ५७ किलो वजनी गटात क्लासिक प्रकारात ३७२.५ किलो तर इक्विप्ड प्रकारात ४०७.५ किलो वजन उचलत स्क्वॉट, बेंचप्रेस, डेडलिफ्ट व टोटल या प्रकारांमध्ये ३ कांस्यपदके आणि ४ सुवर्णपदके मिळवली. तसेच मानाचा ‘बेस्ट लिफ्टर वर्ल्ड’चा तिसऱ्या क्रमांकाचा किताबही त्यांनी पटकावला.


फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, अमेरिका, बेल्जियम, स्पेन, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, साऊथ आफ्रिका आणि जपान या देशांच्या खेळाडूंशी अत्यंत चुरशीची लढत देत त्यांनी भारतासाठी ही विजयश्री खेचून आणली. दोन वर्षांपूर्वी मंगोलिया येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावल्यानंतर त्यांनी आतापर्यंत तीन एशियन चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप जिंकत ओपन, क्लासिक, इक्विप्ड, मास्टर्स व बेंचप्रेस या सर्व प्रकारांमध्ये एकूण १७ वेळा ‘स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र’, ८ वेळा ‘बेस्ट लिफ्टर इंडिया’, ३ वेळा ‘बेस्ट लिफ्टर एशिया’ आणि ‘बेस्ट लिफ्टर कॉमनवेल्थ’ हे किताब पटकावले आहेत.


कोझिकोड येथे झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतून त्यांची या जागतिक चॅम्पियनशिपसाठी निवड झाली होती. डॉ. शर्वरी या पुण्याच्या ‘कोडब्रेकर’ जिममध्ये डॉ. वैभव इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. सदाशिव पेठ येथील ‘आहार आयुर्वेद’ क्लिनिकमध्ये त्या खेळाडूंसाठी तसेच विविध मेटाबोलिक डिसऑर्डरसाठी जीवनशैली मार्गदर्शनाचे प्रशिक्षण देतात.


“आई-वडील, कुटुंबीय, मित्रपरिवार, पुणे-महाराष्ट्र आणि पॉवरलिफ्टिंग इंडिया यांच्या पाठिंब्यामुळेच सर्व अडचणींवर मात करत सातत्याने उच्च पातळीवरील यश मिळवणे शक्य झाले,” असे डॉ. शर्वरी इनामदार यांनी सांगितले. जागतिक स्पर्धेत भारतासाठी त्यांच्या या अत्युत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments