Type Here to Get Search Results !

अल्पकालीन उपायांबाबत उद्या बैठक, नऱ्हे ते रावेत उन्नत मार्गाचाही करणार पाठपुरावा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवले पूल परिसराला भेट देत केली पाहणी

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे (प्रतिनिधी) नवले पूल परिसरात गुरुवारी रात्री झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल. अल्पकालीन उपाययोजनांसंदर्भात उद्या (शनिवारी) संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेतली जाईल. तसेच नऱ्हे ते रावेत व्हाया सुतारवाडी या उन्नत मार्गाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) मंजूर झाला असून त्याला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल,’अशी माहिती पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली.


नवले पूल येथे गुरुवारी झालेल्या अपघातानंतर शुक्रवारी सकाळी मोहोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम आदी उपस्थित होते.


मोहोळ म्हणाले, ‘२०२२ मध्ये येथे मोठा अपघात झाला होता. त्यानंतर जांभूळवाडी ते वडगावपर्यंत सातत्याने होणारे अपघात थांबविण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. त्यातील रम्बलर्सची संख्या वाढवणे, स्पीड गन्स वाढवणे, पंक्चर्स बंद करणे यासारख्या काही अल्पकालीन उपाययोजना अमलातही आणल्या गेल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षात अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु,​ गुरुवारच्या दुर्दैवी अपघातात आठ जणांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे कायमस्वरूपीच्या  उपाययोजनांना गती देणे आवश्यक आहे,’.


‘मागील अपघातानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत पुण्यात तसेच दिल्लीतही बैठक झाली होती. त्यात जांभूळवाडी ते सुतारवाडी व सुतारवाडी ते रावेत या ३२ किलोमीटर लांबीच्या व सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रोड) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा ‘डीपीआर’ही मंजूर झाला आहे.  त्यामुळे येथील अपघात थांबविण्यासाठीच्या या दीर्घकालीन उपाययोजनेला गती देण्यासंदर्भात गडकरीजींची भेट घेऊन पाठपुरावा केला जाईल, असे मोहोळ यांनी नमूद केले.


‘अल्पकालीन उपाययोजनांमध्ये या मार्गावरून येणाऱ्या ट्रक्सची खेड शिवापूर टोल नाक्याजवळच लोड व ब्रेक तपासणी करणे, स्पीड गन्स वाढवून कारवाई करणे, रम्बलर्स वाढवणे आणि सेवा रस्ते पूर्ण क्षमतेने विकसित करणे आदींचा समावेश आहे. तसेच अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने पुढे पाठवता येण्याविषयी चाचपणी केली जाईल. यासंदर्भात पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि पीएमआरडीए या सर्व घटकांची एकत्रित बैठक शनिवारी घेण्यात येईल. या सर्व यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव दिसल्यास कारवाई केली जाईल, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments