मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे, ता. ९:
आपल्या देशात लोकशाहीचे अंधार युग सुरू आहे. लोकशाही आयसीयु मध्ये आहे. १९५२ ते २०२५ पर्यंत निवडणूक आयोगावर गुन्हेगारी स्वरूपाचा आरोप कधीच झाला नव्हता. तो आता होतोय. लोकप्रतिनिधी, न्याय व्यवस्था, निवडणूक आयोग, पोलिस, यांच्यावरचा जनतेचा विश्वास उडत असताना मिडीयाची भूमिका महत्वाची आहे. लोकशाही आयसीयू त जायला लोक देखील जबाबदार आहेत.
अशावेळी माध्यमांनी कायम विरोधीपक्षाची भूमिका बजावली पाहिजे. असे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे रविवारी २५ वे ‘गांधी दर्शन शिबिर संपन्न झाले. यावेळी ‘माध्यम आणि सद्यपरिस्थिती’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आपले विचार मांडले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार जयंत माईणकर यांनी ‘निवडणूक सुधारणेतील गैरप्रकार आणि अपेक्षित सुधारणा यावर विचार मांडले. तर ‘गांधी विचार आणि मी’ याबद्दल मनसोपचारतज्ज्ञ डॉ. रूपेश पाटकर यांचे व्याखाने झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अन्वर राजन होते. व्यासपीठावर माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख उपस्थित होते.
निखिल वागळे म्हणाले की, प्रश्न विचारायला शिका हे आम्हाला पत्रकारितेतील गुरुंनी सांगितले. दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश लढले. पत्रकारांना भारतीय घटना शिकवण्याची गरज आहे. धर्मांधता, जातीयता याला पत्रकारांनी विरोध करायला हवा. सर्व समाज निद्रिस्त होतो तेव्हा कोणीतरी जागा होतो व सर्व देशाला जागा करतो त्यावर माझा विश्वास आहे. आपल्या देशात नेपाळ, बांगलादेश प्रमाणे हिंसक आंदोलने व्हावे असे मला वाटत नाही. मात्र लोकशाही आंदोलन व्हावे असे वाटते. चुकीच्या निर्णयांविरोधात मंत्री, अधिकारी यांच्या गाड्या आडवणे, उपोषण करणे अशी आंदोलने झाली पाहिजेत.
जयंत माईणकर - आपण पंतप्रधानांना प्रश्न विचारु शकत नाही. ही हुकुमशाही कडे वाटचाल आहे. पण नेहरुंनी या देशाच्या लोकशाहीचा पाया इतका मजबूत घातला आहे की, तो कोणालाही संपवता येणार नाही.
चोर पोलिसांच्या एक पाऊल पुढे असतो. यंत्रणेचा योग्य वापर केला तर निवडणूक निःपक्षपाती होवू शकते.
डॉ. रुपेश पाटकर म्हणाले की, भावनिक दारिद्र्य नष्ट करण्यासाठी माणसाने माणसाशी बोलले पाहिजे. गांधीजीकडुन मला हे समजले की, तुमच्या गरजा संपून जे उरते ते समाजाला द्या. गरजे पेक्षा जास्त साठवणे म्हणजे चोरी असे गांधी म्हणत. माझ्या कृतीतून तुम्ही पाहिलेल्या सर्वात गरजू माणसाला काय मदत होईल असा विचार करा. आणि त्याचे उत्तर होकारार्थी असेल तर ती कृती करा.
अन्वर राजन - कोणीतरी अवतार येईल व सुटका करेल यावर आमचा विश्वास नाही. बदल आपोआप होत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आपण लोकशाही वाचवणारे सैनिक आहेत. लढत राहिले पाहिजे. आमचा प्रयत्न लोकांना सहभागी करून घेणे हा आहे. लोकशाही ही जीवन प्रणाली आहे. ती प्रगल्भ व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. हा कार्यक्रम त्याचाच भाग आहे.
तेजस भालेराव यांनी सुत्रसंचालन केले.
फोटो
गांधी दर्शन शिबीरात बोलताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी लक्ष्मिकांत देशमुख, अन्वर राजन आणि तेजस भालेराव.

Post a Comment
0 Comments