Type Here to Get Search Results !

भाषावादामुळे निर्माण झालेले हिंसक वातावरण चिंताजनक !* *नागरिकांचा जीव, मालमत्ता, रोजगाराचे संरक्षण करण्याचे आवाहन* *डॉ.हुलगेश चलवादी यांनी स्पष्ट केली 'बसप'ची भूमिका*


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


पुणे...

विविधतेने नटलेल्या भारतासारख्या जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात सध्या भाषेवरून सुरु असलेले राजकारण समाजात भय निर्माण करणारे आहे.विशेषतः महाराष्ट्र व तमिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये सध्या उफाळून आलेल्या भाषिक वादांमुळे देशभरात निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या वातावरणावर बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुश्री बहन मायावती यांनी चिंता व्यक्त केली आहे, अशी माहिती प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी मंगळवारी (ता.१५) दिली.


धर्म, जात, भाषा आणि प्रांतीय अस्मितेच्या आधारावर राजकारण करणाऱ्या पक्षांमुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण होत आहे.ही प्रवृत्ती अत्यंत घातक असून यावर तात्काळ उपाययोजना होणे आवश्यक आहे,अशी बसपाची भूमिका असल्याचे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले.


राजकीय नेत्यांनी आपली देशभक्ती आणि देशप्रेम कृतीतून दाखवायला हवे.त्याऐवजी ते समाजात भेद निर्माण करणाऱ्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत.अशा परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने देशाच्या अस्मितेचा अभिमान बाळगून संघटित राहणे अत्यंत गरजेचे आहे. बसपाच्या 'सर्वजण हिताय,सर्वजण सुखाय' या धोरणाचा स्वीकार सर्वच राजकीय पक्षांनी विशेषतः महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांनी करावे, असे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले.


देशाची आर्थिक राजधानी मुंबईत देशभरातील विविध राज्यांतून आलेले नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत.त्यामुळे येथे शांतता, सुरक्षितता आणि समन्वय राखणे सरकारची प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे, असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.कामगार, व्यापारी, विद्यार्थी अशा सर्व स्तरांतील नागरिकांचा जीव, मालमत्ता आणि रोजगार यांचे संरक्षण करणे ही राज्य आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे अशा घटनांवर केंद्र सरकारनेही गांभीर्याने लक्ष द्यावे,असे आवाहन सुश्री बहन मायावती जी यांनी केल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.


Post a Comment

0 Comments